Sunday, July 12, 2009

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन
Saturday, June 06th, 2009 AT 12:06 PM


आजकाल हॉटेलिंग करणे ही चैनीची किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. आबालवृद्धांपासून सगळ्याच वयोगटातील लोक या गोष्टीस सरावलेले आहेत. फास्ट फूड आवडणाऱ्यांचा एक नवीन गट तयार झाला आहे. कदाचित कित्येकांनी आपला समतोल आहार सोडून दिनक्रमात त्याचा समावेश केला आहे. ही परिस्थिती थोड्याफार फरकाने घरोघरी आढळते. अशी ही फास्ट फूड सर्व्ह करणारी सेंटर्स आता कानाकोपऱ्यात आढळतात. याला कारण म्हणजे, या पदार्थांची "रेडी टू सर्व्ह' अशी जाहिरात केली जाते. मधल्या वेळचे खाणे किंवा मुलांचे टिफिन किंवा मुख्य जेवणाला पर्याय म्हणूनही या पदार्थांकडे पाहिले जाते. हे फास्ट फूड कशाचे बनलेले असते, ते आरोग्यवर्धक आहे का, हे प्रश्‍न नक्कीच उपस्थित करावेत असे वाटते.
फास्ट फूड हे प्रामुख्यानी प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ (चीज, चरबी, खारवलेले लोणी), मीठ, साखर, अजिनोमोटो, रिफाइंड फ्लोअरपासून बनलेले असतात. यात अतिशय आवडीने खाण्यात येणारे पदार्थ म्हणजे नूडल्स, बर्गर, पिझ्झा, ब्रेड, बन इ. या पदार्थांसोबत शीतपेये घेतली जातात. यातून रिकामे उष्मांक शरीराला मिळतात. तसेच ही सवय लहानपणापासून लागली तर ती एकच चव मुलांना आवडायला लागते.
विशेष करून 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी हा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वाढीच्या वयातील चुकीचे खाणे या मुलांना त्रासदायक ठरू शकते. फास्ट फूड हे प्रामुख्याने रिफाइंड पदार्थांपासून बनलेले असतात. यात कोंडा (आहारातील एक आवश्‍यक घटक) नसतो. या पदार्थांमध्ये स्निग्धांम्लांचा अतिरेकी वापर केला जातो. यात भाज्या, फळे, सालीयुक्त डाळी, कोंडायुक्त धान्याचे पीठ यांचा वापर केलेला नसतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशात जिथे भाज्या, फळफळावळ भरपूर प्रमाणात पिकविले जाते, अशा ठिकाणी या पदार्थांची चलती व्हावी, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे.
या सदोष आहारपद्धतीचे फलित म्हणजे अनावश्‍यक वाढणारे वजन, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, आतड्याचे रोग, पोटाचे विकार इ. व्याधींना आमंत्रण देणारे घटक या आहारात भरपूर प्रमाणात असतात. पौष्टिकतेला लागणारा समतोलपणाचा अभाव असल्यामुळे असा आहार आरोग्यवर्धक होऊ शकत नाही. यातील प्राणिजन्य मेदामुळे हृदयरोग, मधुमेह, अनावश्‍यक वाढणारे वजन इ. व्याधी उद्‌भवू शकतात. यातील मिठाचे प्रमाण अतिरिक्त रक्तदाबाला आमंत्रण देणारे ठरू शकते. या आहारातील कोंड्याच्या अभावी आतड्याची दुखणी, कर्करोग, पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हे रोग गंभीर रूप धारण करू शकतात. हा धोका टाळायचा असेल तर आहारपद्धतीत सुधारणा करणे जरुरीचे आहे.
फास्ट फूड हे लोण पाश्‍चात्त्य देशांतून आलेले असले तरी अमेरिकन सरकारपुढे आलेल्या वैद्यकीय रिपोर्टवरून अमेरिकेत हृदयरोग, आतड्याचे रोग, मधुमेह, कर्करोग यांसारख्या रोगांमुळे आलेले मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हे रोग आणि आहार यांचा निकटचा संबंध आहे.
अमेरिकन सरकारने याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आहार कसा असावा याबाबत प्रसार केला. भारतातही अशाप्रकारे काही मोहीम राबविण्याची गरज आहे असे वाटते. नाही तर चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून व्याधिग्रस्त पुढची पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही. आहारात होत असलेला हा बदल चांगला नसून वाईट आहे, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
दारिद्य्ररेषेखालील लोकांना परिस्थितीअभावी कुपोषण आहे, तर सधन वर्गात "खाऊन-पिऊन उपाशी' असा एक वर्ग चुकीच्या आहारापद्धतीमुळे व आहाराविषयक अज्ञानामुळे फोफावतो आहे. आधीच अनेक प्रक्रिया केलेले अन्न आपल्यापर्यंत पोचते. त्यात चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येकाने आपला आहार तपासून पाहणे आता निकडीचे झाले आहे.
- मृणाल सुरंगळीकर
(आहारतज्ज्ञ, नागपूर)

No comments: